पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बातम्याही लिहिता येत नाहीत - दिनकर रायकर
पत्रकारिता अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था अलिकडे मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्या आहेत. पत्रकारिता अभ्यासक्रम करणारे बहुतांश विद्यार्थी अगदी ६०-७० टक्के गुणांनी उत्तीर्ण होतात. शक्यतो कोणताही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाही. मात्र या विद्यार्थ्यांना बातम्या नीट लिहिता येत नाहीत. ज्या भाषेतून आपण शिक्षण घेतले आहे, त्या भाषेतून किमान काही प्रमाणात तरी योग्य लिहिता यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी केले. परळच्या दामोदर सभागृहात शिक्षक भारतीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रायकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘लोकसत्ता’चे तुषार खरात, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रवीण मुळ्ये, ‘लोकमत’चे पवन होन्याळकर, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या हेमाली छापिया, ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या सायली उधास हे पुरस्कारांचे मानकरी ठरले. पाच हजार रूपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, कार्यवाह अशोक बेलसरे, अंकुश जगदाळे, जयवंत पाटील, आर. बी. रसाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार कपिल पाटील यांनी पुरस्काराविषयीची भूमिका विषद केली. ते म्हणाले की, समाजाच्या सर्वागीण विकासामध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम शैक्षणिक पत्रकार करतात. अनेक पत्रकार वृत्तपत्राने सोपविलेल्या जबाबदारीच्याही पलिकडे जाऊन उत्कृष्ट काम करतात.
शिक्षण भारतीने शिक्षकांसाठी घेतलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम स्पर्धेत संजय कानसे, शशिकांत तांबे, शोभा नाखरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर प्रताप थोरात यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेत मोहिनी घरत, अरूण कांबळे, संगीता चुरी हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.
0 comments:
Post a Comment